मानसी नाईक म्हणतेय ‘आना रे….’

मुंबई : महाराष्ट्राची डान्सिंग स्टार मानसी नाईक बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर जोरदार आगमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘नार नवेली, फुल चमेली, ओठ गुलाबी तिची चाल शराबी’ असे तिचे वर्णन असलेले ‘आना रे…..’ हे आगामी ‘जवानी झिंदाबाद’ या मराठी चित्रपटातील गाणं नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. जुईली जोगळेकरचा स्वर लाभलेल्या या आवाजाला सोशल मिडीयावर तरुणाईचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम. के. एंटरटेनमेंट प्रस्तूत ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव कदम यांनी केले आहे. या चित्रपटातून अभिषेक साठे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, केतकी नारायण नायिकेच्या भूमिकेत आहे. आजच्या तरुणाईचे प्रतिबिंब असलेल्या ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाची निर्मिती नितीन उत्तमराव साठे यांनी केली असून सहनिर्माता नरेंद्र चंद्रकांत यादव (पाटील) आहेत. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात एक हटके अशी हृदयस्पर्शी प्रेमकथा बघायला मिळणार आहे. मनोरंजना बरोबरच यातून एका सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिषेक साठे आणि केतकी नारायण यांच्यासह यतीन कार्येकर, आसावरी जोशी, मधू कांबीकर, पूर्वा शिंदे, सचीन गवळी, अभ्यंग कुवळेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाला कृणाल देशमुख आणि साहील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटातील गीतांना आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, जसराज जोशी, हृषीकेश रानडे, सावनी रविंद्र, जुईली जोगळेकर, दिपांशी नागर यांचा स्वर लाभला आहे. चित्रपटाची कथा नितीन उत्तमराव साठे यांची आहे. एका संवेदनशील सामाजिक विषयावर भाष्य करणारा ‘जवानी झिंदाबाद’ हा चित्रपट येत्या १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.