घाटनांदुर : खंडोबा यात्रेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या प्रमाणात येथे जंगी कुस्त्या संपन्न झाल्या. येथील यशवंत सेना, जयमल्हार मित्रमंडळ व खंडोबा देवस्थान कमिटीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात व आनंदात भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्व जातिधर्मातील लोक एकत्रित येऊन कुस्त्यांचा कार्यक्रम संपन्न करतात. लहानथोरांपासून मानाचे पहेलवान कुस्त्या खेळण्यासाठी अगदी परिसरातून मोठ्या संख्येने कुस्तीच्या मैदानात उपस्थित होते.
राजकारणी नेत्यांसह पाहणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. विविध वाद्यांच्या व लोकांच्या उत्साहात जंगी कुस्त्या संपन्न झाल्या. याप्रसंगी सरपंच ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, माजी जि.प. सदस्य दत्ता जाधव, नेताजी देशमुख, ग्रा.प. सदस्य सुरेश जाधव, उत्तम शिंगाडे, शेख मुर्तुजा, पाराजी वैद्य, दिगंबर जाधव या मान्यवरांसह वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रंग गाढवे, रामभाऊ वैद्य, उत्तम गाढवे, विजय इंगोले, गोपाल गाढवे, गोविंद वैद्य, वसंत चांगीरे, सौदागर वैद्य, संतोष वैद्य यांच्यासह असंख्य पंच उपस्थित होते. विजेत्या पहेलवानांना ठराविक रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. कुस्ती पाहण्यासाठी घाटनांदुर व परिसरातील हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते.