दत्त जयंती नवरात्र महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम

अंबाजोगाई : अनेक वर्षाची परंपरा लाभलेला तसेच सांस्कृतिक व कलात्मक दृष्टीने महत्वपुर्ण असलेला दत्त जयंती मार्गशिर्ष नवरात्र महोत्सव ३ ते १३ डिसेंबर या कालावधीत दत्त संस्थान थोरले व धाकटे देवघर येथे संपन्न होत असून यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दत्तजयंती नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने पत्रकार राहुल देशपांडे यांनी दिली. दत्त जयंती नवरात्र महोत्सवानिमित्त दत्त संस्थान ( मंदीर ) थोरले देवघर येथे संपन्न होणार्‍या कार्यक्रमात सकाळी अभिषेक, मंत्र अनुष्ठान, वेदोक्त श्‍लोक, स्त्रोत्र, अष्टक, जयंती, महानिरांजन, प्रदक्षिणा, दासोपंत रचित भजन आदी कार्यक्रम होतील.

३ ते १० डिसेंबर या कालावधीत रात्रौ किर्तन, दि. ६ ते १० डिसेंबर रोजी दुपारी प्रवचन, भजन. ७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा मंदीर परिसरात पालखी. ८, ९ व १० डिसेंबर रोजी सायंकाळी व रात्री उशिरा मंदिर परिसरात पालखी. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी गुरूपुजन व अवतारोत्सव सोहळा, १२ डिसेंबर रोजी प्रातःसमयी भजन,प्रवचन व पालखी सोहळा तसेच दत्त जयंती निमित्ताने धार्मिक कार्यक्रम व दत्त सहस्त्रनाम, षोडशोवतार हवन (होम) होवुन पुर्णाहुतीचा कार्यक्रम होईल. दि. १३ डिसेंबर रोजी प्रातः समयी प्रवचन, पालखी सोहळा त्यानंतर लोककला सादरीकरणाने दत्तजयंती महोत्सवाचा समारोप होईल. या सर्व कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.