लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज : सहाय्यक निवडणूक अधिकारी दिपक वजाळे

टीम AM : भारत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. बीड जिल्ह्यात केज मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांनी दिली. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे उपस्थित होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी वाजळे यांनी सांगितले की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बीड मतदारसंघात केज मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणूकीच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून भयमुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी दिपक वाजळे यांनी यावेळी केले.

18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना

बीड लोकसभेच्या मतदारसंघांसाठी 13 मे 2024 रोजी मतदान होईल. त्यासाठी 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. 25 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 26 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 29 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 13 मे 2024 रोजी मतदान होऊन 4 जून 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.

3 लाख 71 हजार 620 मतदार

बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघात एकूण 3 लाख 71 हजार 620 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 95 हजार 448, महिला मतदारांची संख्या 1 लाख 76 हजार 169 एवढी आहे. तृतीय पंथी मतदारांची संख्या 03 एवढी आहे, तर दिव्यांग मतदारांची संख्या 1 हजार 991 आहे. 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 8 हजार 417 एवढी आहे. तर 18 ते 19 वर्षामधील युवा मतदारांची संख्या 3 हजार 472 एवढी आहे. लोकसभेच्या या केज मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या 415 एवढी आहे. 

मतदान प्रक्रियेसाठी मनुष्यबळाचे नियोजन

मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि ‘इव्हीएम’ युनिटचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, सावलीसाठी मंडप आदी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाल्याचेही सहाय्यक निवडणूक अधिकारी वाजळे यांनी सांगितले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेवर देखरेखीसाठी फिरत्या पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, माध्यमांमधील जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे, अशीही माहिती यावेळी उपजिल्हाधिकारी वजाळे यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.