टीम AM : अभिनेता टायगर श्रॉफ याची त्याच्या चाहत्यांमध्ये ॲक्शन हिरो म्हणून ओळख आहे. बॉलिवूडच्या या ॲक्शन हिरोचा आज 33 वा वाढदिवस आहे. टायगर श्रॉफ बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. टायगर फक्त अभिनयातच नाही तर, मार्शल आर्टमध्येही तो कुशल आहे. खरं तर त्याने आपल्या बालपणापासूनच मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलं होतं. आज आपण टायगर श्रॉफच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरोपंती’ चित्रपटातून टायगरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. आपल्या सिनेकारकिर्दित टायगरने ‘हिरोपंती’, ‘बागी’, ‘अ फ्लाईंग जॅट’, ‘बागी 3’, ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’, ‘वॉर 2’ सारख्या या चित्रपटातून टायगरने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सिनेसृष्टीमध्ये डेब्यू करण्यापूर्वी टायगरला खेळात, डान्समध्ये आणि मार्शल आर्ट्समध्ये प्रचंड आवड होती. त्याने वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. पण अचानक त्याने अभिनयात करीअर करण्याचा निर्णय घेतला.
टायगर श्रॉफ हा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा असला तरीही टायगरला बॉलिवूडमध्ये सहज प्रवेश मिळाला नाही. त्याला अनेक कटू प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. टायगर श्रॉफचं खरं नाव टायगर नाही तर जय हेमंत श्रॉफ असं आहे. टायगरनं त्याचं शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून पूर्ण केलं आहे. जेव्हा त्याने बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याने आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्याला घरात टायगर या नावानं हाक मारली जायची. म्हणून टायगरने बॉलिवूडमध्ये डेब्यू करताना आपलं नाव जय हेमंत श्रॉफ म्हणून नाही तर टायगर नावाने डेब्यू केलं.
टायगर श्रॉफ आपल्या ॲक्शन सीन्ससाठी ओळखला जातो. टायगरने अभिनेता अक्षय कुमार आणि जॅकी चॅन यांच्याकडून ॲक्शनची प्रेरणा घेतली आहे. “मी लहानपणापासूनच ॲक्शन सीन्स करतो. मी माझ्या बालपणापासून अक्षय कुमार आणि जॅकी चॅनचे चित्रपट पाहून ॲक्शन सीन्स शिकलो आहे. ॲक्शन सीन्सची मला आवड आहे.” असं टायगरने ‘अमर उजाला’सोबत संवाद साधताना सांगितले होते.
2023 मध्ये रिलीज झालेल्या अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायगर श्रॉफची एकूण संपत्ती 80 कोटी रुपयांच्या आसपास आहे. तो एका चित्रपटासाठी जवळपास आठ कोटी रुपये इतके मानधन आकारतो. तर एका जाहिरातीसाठी तो चार ते पाच कोटी रुपये इतके मानधन घेतो. टायगरकडे बीएमडब्ल्यू 5 सिरीज, रेंज रोवर, जॅग्वार अशा अलिशान महागड्या कार आहेत. याशिवाय काही वर्षांपूर्वी टायगरने मुंबईत सीफेसिंग अपार्टमेंट विकत घेतलं आहे. याआधी ही त्याच्याकडे दोन फ्लॅट असून त्याची किंमत काही कोटींच्या घरात आहे. टायगरला वाढदिवसाच्या शुभेच्छा.