अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

टीम AM : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन 2020 – 21 ते 2025 – 26 या कालावधीसाठी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी दिली.

शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या   www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. ही योजना राज्य शासनाच्या ‘महाडीबीटी’ पोर्टल अंतर्गत राबविण्यात येते आहे. योजनेचा लाभ हा  (डीबीटी) द्वारे देण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी आधार क्रमांक बँक खात्यास जोडलेला असणे आवश्यक आहे. याबाबतची जबाबदारी संपूर्णतः विद्यार्थ्यांची असून त्यांनी त्यांचे बँक खाते, दूरध्वनी क्रमांक, आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.

प्रतिवर्षाच्या शिष्यवृत्तीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांचा मागील वर्षाचा समाधानकारक प्रगती अहवाल व मागील वर्षाची किमान 75 टक्के उपस्थिती आवश्यक आहे. अनुसूचित जातीच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज अद्यापही सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज सादर करावेत. तसेच या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही करावी व तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेले अर्ज देखील तात्काळ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना सादर करावेत. सदर अर्ज वेळेमध्ये सादर न केल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्याची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्रीमती सोनकवडे यांनी केले आहे.