दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी 2 हजार कोटींवर निधी वितरणास मान्यता : शासन निर्णय निर्गमित

टीम AM : नैसर्गिक आपत्तीत राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत असून खरीप हंगाम – 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी 2 हजार 443 कोटी 22 लाख 71 हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.  याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा निधी उपलब्ध होणार असल्याने या शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळेल. तसेच या निर्णयामुळे राज्य शासनाने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचा विश्वास, मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

मंत्री पाटील यांनी सांगितले, राज्यातील 40 तालुक्यांमध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.  या तालुक्यातील बाधित शेतकरी खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय करण्यात आले. त्यानुसार दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता 33 टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना ही मदत होणार आहे. हा शासन  निर्णय निर्गमित झाल्यामुळे दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

खरीप हंगाम – 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यास मान्यता दिली असल्याचेही मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री पाटील यांनी सांगितले.