टीम AM : मराठी चित्रपटसृष्टीमधली ‘एव्हरग्रीन’ अभिनेत्री म्हणून वर्षी उसगांवकर यांचे नाव घेतले जाते. वयाच्या 56 व्या वर्षी देखील वर्षा उसगांवकर तितक्याच तरुण आणि उत्साही दिसतात. वर्षा उसगांवकर यांनी आपल्या घाऱ्या डोळ्यांनी, देखण्या चेहऱ्याने अवघ्या मनोरंजन विश्वावर राज्य केलं. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केवळ मराठी मनोरंजन विश्वच नाही, तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. आज (28 फेब्रुवारी) अभिनेत्री वर्षा उसगांवकर आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर याच निमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी…
वर्षा उसगांवकर यांचा जन्म गोव्यामधील उसगावमध्ये झाला. या गावाच्या नावावरूनच त्यांचं आडनाव उसगांवकर असं पडलं. वर्षा उसगांवकर यांचे वडील राजकारणात सक्रिय होते. परंतू, वर्षा यांना मात्र राजकारणात अजिबात रस नव्हता. आपण मोठं होऊन अभिनेत्री व्हायचं, हे त्यांनी अगदी लहानपणीच ठरवलं होतं. आपल्या ध्येयाच्या दिशेनेच त्यांनी वाटचाल करायला सुरुवात केली होती. त्यांना बालपणापासूनच नृत्य आणि गाण्याची प्रचंड आवड होती. मात्र, लाजऱ्या स्वभावाच्या वर्षा शाळेच्या कार्यक्रमांमध्ये क्वचितच सामील व्हायच्या.
असा मिळाला आत्मविश्वास
लाजऱ्या स्वभावामुळेच त्यांनी शाळेमध्ये असताना कधी कुठल्या कार्यक्रमात भाग घेतला नाही. परंतू, नववीमध्ये असताना त्यांना स्टेजवर नृत्य करावं वाटलं आणि त्यांनी ‘दिसला ग बाई दिसला’ या लावणीवर स्वतःच नृत्य बसवून ते सादर केले. त्यांच्या या नृत्य कौशल्याचं सर्वांनी कौतुक केलं आणि यामुळे त्यांच्या मनात स्वतःविषयी आत्मविश्वास निर्माण झाला. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यासह विविध स्पर्धांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण देखील घेतलं.
प्रत्येक क्षेत्रात झोकून देऊन काम केलं
अभिनयासोबतच वर्षा उसगांवकर यांना गाण्याचीही प्रचंड आवड होती. सुंदर चेहऱ्यासोबतच त्यांना गोड गळा देखील लाभला आहे. त्यांच्या गाण्याचे अनेक ठिकाणी कार्यक्रमही झाले आहेत तर, रसिक प्रेक्षकांनी त्यांच्या गाण्यांना दादही दिली आहे. गाण्याच्या आवडीमुळे त्यांनी गायनाचं शास्त्रशुद्ध शिक्षणही घेतलं. आपण जे काही करू त्यात पूर्णपणे झोकून द्यायचं हा वर्षा उसगांवकर यांचा स्वभाव होता. हेमा मालिनी यांची निर्मिती असणाऱ्या ‘राणी लक्ष्मीबाई’ या मालिकेत काम करण्यासाठी वर्षा घोडेस्वारी शिकल्या होत्या. या मालिकेमध्ये त्यांना घोड्यावर बसून काही सीन द्यावे लागणार होते. त्यासाठी हेमा मालिनी यांनी वर्षा उसगांवकर यांना घोडेस्वारी शिकायला लावली होती. त्या रोज पहाटे 5 वाजता उठून घोडेस्वारी शिकायला जायच्या. वर्षा उसगांवकर यांनी नेमबाजीचंही प्रशिक्षण घेतलं आहे. वर्षी उसगांवकर यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.