‘कभी कभी’ : ‘एंग्री यंग मॅन’ अमिताभ यांची प्रतिमा झाली रोमँटिक, वाचा… 

टीम AM : यश चोप्रा यांचा ‘कभी कभी’ हा अविस्मरणीय चित्रपट आजच्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी 1976 रोजी प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटात राखी, शशी कपूर, ऋषी कपूर, वहिदा रहमान, नीतू सिंग यांच्या भूमिका होत्या. अमिताभ यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाच्या सुरुवातीला अमित आणि पूजा यांची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. पण काही कारणांनी त्यांचे लग्न होत नाही, असे चित्रपटात दाखवण्यात आले होते. पूजाचे लग्न दुसऱ्या मुलाशी होते. या चित्रपटात अमितच्या भूमिकेत अमिताभ बच्चन तर पूजाच्या भूमिकेत राखी या अभिनेत्री होत्या.

अमिताभ बच्चन यांचे आई – वडील हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन या चित्रपटात केवळ एका सीनसाठी होते. यात त्यांना कोणता संवाद देखील नव्हता. केवळ मुलीचे कन्यादान ते दोघे करत आहेत असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. हा चित्रपट बनवण्याची कल्पना यश चोप्रा यांना त्यांचे जवळचे मित्र आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या कवितेतून सुचली. साहिर यांच्या गाण्यांनी त्यांना हा चित्रपट करण्याची प्रेरणा दिली. यश यांना त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार जोडी लक्ष्मीकांत – प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील गाणी मिळवायची होती, पण साहिर त्यासाठी तयार नव्हते. गाण्यांच्या मूडला न्याय मिळणार नाही असं त्यांना वाटत होतं. फक्त खय्यामच उत्तम संगीत तयार करू शकतील, असे त्यांना वाटले आणि तसेच झाले. खय्याम यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला तर साहिर लुधियानवी यांना ‘कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है’ साठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला. हे गाणं गाणाऱ्या मुकेशला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला.

लता मंगेशकर यांनीही त्यात आपला मधुर आवाज दिला. अमिताभ यांनी आपल्या भव्य आवाजात ‘कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है’ या ओळी सांगितल्यावर सिनेमागृहात बसलेले प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. यातील इतर गाणी ‘मैं पल दो पल का शायर’, ‘सुर्ख जोड़े की ये जगमगाहट’, ‘मेरे घर आई एक नन्हीं परी’, ‘तेरा फूलों जैसा रंग’ गाणी गाजली होती.

‘कभी कभी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले. काश्मीरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये चित्रित करण्यात आलेल्या दृश्यांनी सिनेमागृहात बसलेल्या प्रेक्षकांना आनंद दिला. या चित्रपटाच्या यशाने ‘एंग्री यंग मॅन’ अमिताभ यांची प्रतिमा रोमँटिक हिरो अशी झाली.

शब्दांकन : संजीव वेलणकर