बीड लोकसभा निवडणूकीत मुंडे विरूध्द मुंडे ?

‘इंडीया’ आघाडीत समन्वय साधून निवडणूक जिंकू : प्रा. ईश्वर मुंडे

टीम AM : लोकसभा निवडणूकीची घटीका समीप येत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या सक्षम उमेदवाराला निवडणूकीच्या मैदानात उतरवण्यासाठी उमेदवारांची चाचपणी करत आहे. भाजपकडून खा. प्रितम मुंडे किंवा पंकजा मुंडे यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे तर आगामी बीड लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाने संधी दिल्यावर आपण लोकसभा निवडणूक लढवणार असून ‘इंडीया’ आघाडीतील सर्व घटक पक्षांचा समन्वय साधून बीड लोकसभा निवडणूक जिंकू, असा विश्वास प्रा. ईश्वर आनंदराव मुंडे यांनी अंबाजोगाई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. यामुळे आगामी बीड लोकसभा निवडणूकीत मुंडे विरूध्द मुंडे ? असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना प्रा. ईश्वर मुंडे म्हणाले की, मी गांजपूर ता. धारूर जि. बीड, हल्ली मुक्काम आनंद भवन यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई आहे. माझे शिक्षण एम.ए.बी.एड – मराठी असून जि. प. बीड अंतर्गत 1995 ला प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी अशी सेवा करून खा. शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, त्यांच्याशी चर्चा करून मी  2016 ला स्वेच्छा सेवानिवृत्ती घेवून पूर्णवेळ सामाजिक, राजकीय कार्य करत आहे. माझ्या बालमनावर शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा प्रभाव झालेला असल्यामुळे ते माझ्या सामाजिक व राजकीय कार्याचे प्रेरणास्थान बनलेले आहेत. आजपर्यंत मी तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता. धारूर नंतर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी या पदांवर काम केलेले आहे आणि आता राज्य प्रमुख, सेवा निवृत्त कर्मचारी, अधिकारी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले. 

पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, मी बीड लोकसभा निवडणूक लढवावी, अशी जनतेतून मागणी येत असल्यामुळे या बाबत मी खा. शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील व आ. जितेंद्र आव्हाड यांची प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा केली असता तिघांनीही तुम्ही बीड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कामाला लागा, असे मला आदेश दिलेले आहेत. म्हणून मी दि.18 फेब्रुवारी रविवारी जनसंपर्क अभियानास सुरूवात केलेली आहे. सध्या जिल्ह्यातील जनता, कार्यकर्ते व ‘इंडीया’ आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधत असून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करत असल्यामुळे मला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बीड लोकसभा ‘इंडीया’ आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे. पक्षाने मला उमेदवारीची संधी दिली तर किंवा इतरही कोणी उमेदवार असेल तरीही ‘इंडीया’ आघाडीतील पक्षात समन्वय साधून बीड लोकसभा निवडणूक लढून जिंकू, असा विश्वास प्रा. ईश्वर मुंडे यांनी अंबाजोगाई येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.