राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची नियुक्ती

महाराष्ट्रातील राजकिय, सामाजिक, आर्थिक व सहकार तसेच शैक्षणिक क्षेत्रातून राजकिशोर मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

टीम AM : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा अंबाजोगाई नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तसेच मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य राजकिशोर मोदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेनुसार व सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राजकिशोर मोदी यांना त्यांचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

अंबाजोगाई नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी 21 आक्टोबर 2021 रोजी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. साधारणतः सव्वा दोन वर्षांपूर्वी राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून ते पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. या काळात राजकिशोर मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर तसेच ग्रामीण भागात सचोटीने पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. अंबाजोगाई शहर व परिसरात राष्ट्रवादी आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबवून राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा प्रत्येकाच्या घराघरात पोचविण्याचे काम केले. त्यांनी अनेक नवीन कार्यकर्ते पक्षात आणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी कार्य केले आहे. 

राजकिशोर मोदी यांनी मागील दोन अडीच – वर्षांमध्ये कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या याच पक्षनिष्ठेची पावतीच म्हणून की काय मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल केवळ अंबाजोगाई शहरातूनच किंवा बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.