भयमुक्त साहित्य निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची गरज – ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी

यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा शानदार समारोप

अंबाजोगाई : आजच्या तरुण साहित्यिकांनी भयमुक्त साहित्य निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ लेखक नाटककार तथा ९९ व्या अखील भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले. येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोपीय भाषणात गज्वी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परमेश्वर मांडगे, बाबु बिरादार, उध्दवबापू आपेगांवकर, संदीप काळे हे चार पुरस्कार मुर्ती, यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचिव दगडु लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे हे उपस्थित होते.

आपल्या विस्तारीत भाषणात प्रेमानंद गज्वी पुढे बोलतांना म्हणाले की,पारंपरिक साहित्य निर्मितीला छेद देत समाजाचं वेगळ चित्र कस निर्माण करता येईल याचा विचार नवसाहित्यिकांमध्ये निर्माण व्हायला हवा. जग सुंदर करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे काम यापुर्वीच्या साहित्यिकांनी केले. या कल्पनेला छेद देत नव्या साहित्यिकांनी आपल्या साहित्यात आता समाजातील अनिष्ठ घटना बध्दल, समाजातील अनिष्ठ प्रवृत्ती बध्दल सडतोडपणे लिहिण्याची गरज आहे.आजचे मराठी साहित्य हे एकारलेले साहित्य असून या एकारलेल्या साहित्यातुन बाहेर पडण्यासाठी बोधी सुत्रातील अकरा सुत्रांचा अभ्यास करावा लागेल. या नव्या साहित्याच्या माध्यमातून लेखकांनी माणसाच्या मनातील भय दुर करण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत असे ही मत प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई शहरात गेल्या ३४ वर्षापासून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जपण्यासाठी, त्यांच्या विचारांची जपवणुक या तीन दिवसीय स्मृती समारोहाची सुरु करण्याचे काम ही एक चळवळ आसून या कामाला प्रेमानंद गज्वी यांनी शुभेच्छा देवून संयोजकांचे कौतुक केले.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रस्ताविक यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचिव दगडु लोमटे यांनी केले. या समारंभात मराठवाड्यातील कृषी, साहित्य, संगीत व युवा या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात बेलवाडी, ता.जि.हिंगोली येथील कृषि उद्योजक (दुध प्रकल्प) रामेश्‍वर मांडगे यांना “कृषी”, देगलुरचे ज्येष्ठ साहित्यिक बाबु बिरादार यांना “साहित्य”, अंबाजोगाईचे पखवाज वादक पं.उध्दव बापु आपेगावकर यांना “संगीत” तर महाराष्ट्रात सकाळ समुहाच्या यीन प्रकल्पांतर्गत युवकांचे संघटन करणारे लेखक तथा पत्रकार संदीप काळे, नांदेड यांना “युवागौरव” सन्मान प्रदान करण्यात आला. यांचा प्रत्येकी स्मृतीचिन्ह, रोख पाच हजार रूपये, शाल, पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. यावेळी रामेश्वर मांडगे, बाबु बिरादार, उध्दवबापु आपेगांवकर आणि संदीप काळे यांनी आपल्या सत्काराबध्दल ऋण व्यक्त करणारे मनोगत ही व्यक्त केले.

शास्त्रीय संगीत सभेने समारोहाचा समारोप

तीन दिवसीय चालणाऱ्या या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा समारोप शास्त्रीय संगीताच्या मैफिलीने झाला. या मैफलीत मुंबई येथील सुप्रसिध्द शास्त्रीय संगीत गायीका देवकी पंडीत यांनी आपल्या गायनात नाट्यगीत, भावगीत, भक्तीगीत, गझल सादर केल्या. देवकी पंडीत यांना तबल्यावर आशय कुलकर्णी पुणे व संवादिनीवर अभिषेक शिनकर-पुणे यांनी साथ दिली. या तीन दिवसीय समारोहात चित्रकला प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, ग्रंथ विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अंबाजोगाई येथील हौशी छायाचित्रकारांचा समुह ‘ टीम भोवताल’ यांच्या सदस्यांचे छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमस्थळी चित्रप्रदर्शनी भरवणा-या सर्व चित्रकार आणि छायाचित्रकार यांचा समारोह समितीच्या वतीने स्मृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला.

कै.भगवानरावजी लोमटे यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या समारोहाचे महाराष्ट्रभर कौतुक होत आलेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचलेल्या या समारोहास रसिक श्रोत्यांनी तिन्ही दिवस उपस्थित उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल समारोहाचे सचिव दगडू लोमटे, भगवानरावजी शिंदे बप्पा, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, सतीष लोमटे, राजपाल लोमटे यांनी रसिक श्रोत्यांचे आभार मानले आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सतीष लोमटे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक, अखील भारतीय नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांचा परीचय प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. मेघराज पवळे यांनी मानले.