टीम AM : मधुबाला आजही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिचं स्थान आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. मात्र, ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या दिवशी जन्मलेल्या मधुबालाला आयुष्यभर तिचं प्रेम मिळालं नाही. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी ती हे जग सोडून गेली. तिने केवळ दिलीप कुमार यांच्यावरील रागापायी दुसऱ्या अभिनेत्याशी लग्न केलं होतं. मात्र त्या नात्याचा शेवट अतिशय वाईट झाला. नेमकं काय घडलेलं ? वाचा..
फिल्म इंडस्ट्रीतल्या करिअरमध्ये मधुबालाचं नाव पडद्यावरच्या थंडगार वाऱ्याच्या झुळूकासारखे अनेक लोकांशी जोडलं गेलं. मधुबालाचं नाव प्रथम प्रेमनाथ यांच्याशी जोडलं गेलं. त्यानंतर तिचं नाव केदार शर्मा आणि कमाल अमरोही या दिग्दर्शकांसोबतही जोडलं गेलं. मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर खूप प्रेम करत होती. पण त्यांच्याशी तिचं कधीच लग्न होऊ शकलं नाही. मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांना दिलीप कुमार कधीच पसंत नव्हते असं म्हटलं जातं. मात्र, मधुबालाची बहीण जाहिदा हिने एकदा सांगितले होते की, दिलीप कुमार आणि अताउल्ला खान यांच्यात एका व्यवसायाबाबत वाद झाला होता आणि त्यामुळे दिलीप कुमार मधुबालापासून दुरावले होते.
मधुबालाने किशोर कुमार यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मधुबालाची तब्येत खराब असताना किशोर कुमार यांनी तिला प्रपोज केलं. दिलीप कुमार यांच्याशी 9 वर्षाचं नातं तुटल्याने मधुबाला दुखावलेली होती. त्या रागातच तिने किशोर कुमार यांना होकार दिला. मात्र, लग्नानंतर तिची तब्येत आणखीनच खराब झाली. त्यानंतर मधुबाला आणि किशोर कुमार उपचारासाठी लंडनला गेले होते. मधुबालाच्या हृदयात छिद्र असल्याने ती 2 वर्षांपेक्षा जास्त जगू शकणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या नात्याला कुटुंबीयांनी नेहमी विरोध केला होता. मात्र, सर्वांचा विरोध पत्कारून त्यांनी लग्न केले होते. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. अखेर 23 फेब्रुवारी 1969 रोजी वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी मधुबालाचे निधन झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली.