हायवा ट्रकची दुचाकीला जोराची धडक : 3 भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

टीम AM : छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातील बाळापूर फाट्यावर हायवा ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तीन भावंडांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिघेही मृत बहिण – भाऊ असल्याची माहिती समोर आली असून ते परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे या तिघांचा मृत्यू झाला आहे. ते तिघेही बहिण – भाऊ होते. मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते. आज सकाळी दहाच्या सुमारास बीड बायपासवरून अंभोरे बहिण – भाऊ प्रवास करत होते. यावेळी दोन हायवा ट्रकमध्ये एकमेकांना ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरू होती. यातील एक हायवा ट्रक चालकाने अंभोरे बहिण – भावाच्या दुचाकीला बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर जोरदार धडक दिली. या धडकेनंतर हायवा ट्रक त्या तिघांच्या अंगावरून गेला. त्यामुळे तिन्ही बहिण – भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

परीक्षा देण्यासाठी जात होते बहीण – भाऊ 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाल्याची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा केला असता अपघातात मृत झालेले तिघेही बहिण – भाऊ असल्याची त्यांना माहिती मिळाली. तसेच त्यांच्या मृतदेहाशेजारी वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले आहेत. त्यामुळे ते तिघेही परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी अपघातानंतर त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून तिघांचे मृतदेह शासकीय घाटी रूग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांकडून अपघात करणाऱ्या हायवा ट्रकचा शोध घेतला जात आहे. यासाठी पोलीस सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत.