मोटारसायकलचे अचानक लागले ब्रेक.. अंबासाखरच्या माजी संचालकाचा मृत्यू

टीम AM : मौजे होळचे रहिवासी तथा अंबासाखर कारखान्याचे माजी संचालक औदुंबर (बाबा) भाऊसाहेब शिंदे (वय 65) यांचे मोटारसायकल अपघातात निधन झाल्याची घटना घडली.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास औदुंबर बाबा शिंदे हे अंबाजोगाई येथून होळ येथे मोटारसायकलवरून जात असताना होळेश्वर शाळेच्या समोर शाळेतील मुले हायवे रस्त्यावर फिरत असताना अचानक मोटारसायकलचे ब्रेक लागल्याने औदुंबर शिंदे हे ऐन सिमेंट रस्त्यावर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला व तोंडाला जबरदस्त मार लागला. औदुंबर यांना सरपंच योगेश यांनी तात्काळ लातूर येथील खाजगी सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी तात्काळ अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार त्यांना लागलीच स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात तातडीने पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

डाॅक्टरांनी अथकपणे प्रयत्न करूनही काहीच उपयोग झाला नाही. अखेर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचा अत्यंविधी मौजे होळ ता. केज येथे करण्यात आला. औदुंबर यांच्या पश्चात पत्नी शुभांगी, मुलगा प्रविण, नातवंडे, बंधु असा भरगच्च परिवार आहे. याप्रसंगी पंचक्रोशीतील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.