तलत महमूद यांनी गाणं ऐकलं अन् सुमन कल्याणपूर यांचा संगीतप्रवास सुरू झाला…जाणून घ्या जीवनप्रवास

टीम AM : ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचा आज वाढदिवस आहे. सुमन यांचा यंदाचा वाढदिवस खास असणार आहे. मराठी संगीतक्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या सुमन यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमन यांनी मराठीसह, गुजराती, बंगाली आणि पंजाबी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 

सुमन कल्याणपूर यांचा जन्म बांगलादेशातील भवानीपूर येथे 28 जानेवारी 1937 रोजी झाला. त्यांच्या मराठी भावगीत गायनाची सुरुवात ग.दि. माडगुळकरांच्या गीतापासून झाली. त्यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपट गीतांवर भावगीतेही गायली आहेत. सुमन यांचे माहेरचे आडनाव हेमाडी असून लग्नापूर्वी त्या सुमन हेमाडी या नावानेच गात असे. 

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुमन कल्याणपूर म्हणाल्या की, ‘भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला त्यामुळे मी खरंच भारावून गेले आहे. माझ्या गाण्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी माझं गाणं हृदयात जपून ठेवलं. माझ्या आवाजाचा विसर न पडणं हे माझं खरचं सुदैव आहे, असं मला वाटतं. जेव्हा सर्व पुरस्कारांची आस संपते, त्याच वेळी भारत सरकारने माझ्या गानसेवेचा सन्मान केला, मी भरभरुन पावले’.

सुमन कल्याणपूर यांचं ‘कोई पुकारे धीरेसे तुझे ऑंख के तारे’ हे रुपेरी पडद्यावरचं पहिलं गीत. सुमन शुद्ध शास्त्रीय आणि नाट्य संगीताकडे फारशा वळल्या नाहीत. सुमनने गायलेल्या ‘मन मोहन मन मे हो तुम्ही’ या गीताला मानाचा तानसेन पुरस्कार लाभला आहे. 

सुमन कल्याणपूर यांनी संगिताचा कसून अभ्यास केला आहे. मराठी, बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा वेगवेगळ्या भाषांतील गाणी त्यांनी म्हटली आहेत. गझल, ठुमरी, भक्तीगीते यात त्यांना जास्त गोडी होती. मराठी संगीतक्षेत्रात सुमन ताईंचे बहुमुल्य योगदान आहे. आपल्या आवाजाने त्यांनी सर्वांनाच वेड लावलं आहे. जुन्या पिढीतील मंडळी आजही त्यांची गाणी गुणगुणताना दिसतात. 

सुमन कल्याणपूर यांचा सिनेसृष्टीतील प्रवास कसा झाला ? 

सुमन कल्याणपूर यांचे सिनेसृष्टीतले आगमन गझलसम्राट तलत महमूद यांच्यामुळेच झाले. एका कार्यक्रमात गाणं गात असताना तलत महमूद यांनी सुमनताईंचा आवाज ऐकला. त्यांनंतर त्यांच्या एका सिनेमासाठी त्यांनी सुमनताईंना विचारणा केली. सुमन कल्याणपूर यांनी देखील होकार दिला. सुमन कल्याणपूर यांना शुभेच्छा.