डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 30 वा नामविस्तार दिन
टीम AM : प्रकांडपंडित म्हणून जागतिक स्तरावर गौरविल्या गेलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी विरोध होणे, 17 वर्षे संघर्ष करावा लागणे, हाच चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. खरे तर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा हा सामाजिक समतेच्या विजयाचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन नामांतर लढ्याचे अभ्यासक, माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 30 वा नामविस्तार दिन 14 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. ’नामांतर लढा व नामविस्ताराची तीन दशके’ या विषयावर ‘एमजीएम’ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांचे व्याख्यान झाले. नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी भूषविले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. गौतम पाटील, डॉ. योगिता होके – पाटील व कुलसचिव दिलीप भरड, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, ज्यांना शिक्षणाचा कसलाही गंध नाही, अशा अनेक अडाणी माणसांची नावे शाळा, महाविद्यालयास बिनबोभाटपणे दिली जात होती. त्या काळात ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्यास विरोध झाला, ही दुर्देवाची गोष्ट आहे. तब्बल 17 वर्षे नामांतरासाठी लढा द्यावा लागणे, विरोध होणे हीच खेदाची बाब आहे. वास्तविक डॉ. आंबेडकर हे सामाजिक स्वातंत्र्याच्या लढयाचे प्रणेते होते. ते ख-या अर्थाने राष्ट्र निर्माते होते. 1927 मध्येच सायमन कमिशनच्या वेळीच डॉ. आंबेडकर यांनी विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्याबद्दलची मांडणी प्रभावीपणे केली होती. मराठवाड्यात पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्यामुळेच अनेक बहुजन समाजातील पिढया शिकू शकल्या. अशा महामानवाचे नाव मिळणे हा एक प्रकारे विद्यापीठाचा गौरव आहे, असेही डॉ. गव्हाणे म्हणाले. नामविस्तारांनंतर विद्यापीठाने गेल्या 30 वर्षात मोठी प्रगती केली आहे. विशेषतः सामाजिक परिवर्तनात विद्यापीठाचे मोठे योगदान आहे, असेही डॉ. गव्हाणे म्हणाले. सुमारे एका तासाच्या व्याख्यानात डॉ. गव्हाणे यांनी नामांतर लढयाचे विविध पैलू मांडले.

सामाजिक नैतिकता, मुल्यांचे जतन व्हावे : कुलगुरु
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सामजिक नैतिकता, मुल्यांचे जतन केले पाहिजे. त्या काळात मराठवाडयासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी भावना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेच्या वेळी बोलून दाखविली. त्यांचे नाव मिळाले, त्यामुळे खरेतर विद्यापीठाचाच गौरव झाला आहे. विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर विद्यापीठ गेट हे लाखो अनुयायाचं श्रद्धास्थान बनले आहे. राज्यातील लाखो लोक आज विद्यापीठ गेटवर येतात, मनोभावे नतमस्तक होतात. गेल्या तीस वर्षात विद्यापीठाने मोठी प्रगती केली आहे. नामविस्तारावेळी असलेली विभागांची संख्या 30 वरुन आज 45 पर्यंत पोहोचली आहे. प्रबोधनाचा वसा आणि वारसा आपण सर्वांनी मिळून नेटाने पुढे नेला पाहिजे, असेही डॉ. गोसावी म्हणाले.
संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी प्रास्ताविकांत नामांतर लढयाचा इतिहास मांडला. डॉ.संजय शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय तर सुवर्णपदकांची घोषणा डॉ. भारती गवळी यांनी केली. प्रा. प्रराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. विष्णु क-हाळे यांनी आभार मानले. मुद्रण विभागाने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व स्तरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.