टीम AM : मनोज कुमार यांच्या ‘उपकार’ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्रदिनी अन् प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं गाणं ‘मेरे देश की धरती‘… हे गाणं कल्याणजी – आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने. महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात 9 जानेवारी 1934 साली झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत – संगीताकडे त्यांचा वाढता कल होता. त्यांचे कुटुंब मुंबईत आले तेव्हा महेंद्र कपूर यांना एक दिशा मिळाली. या मार्गावर खूप संघर्ष करावा लागणार, हे त्यांना माहीत होते. शालेयस्तरावरच त्यांचा गोड आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला.
प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. सेंट जेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. पं. तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोतदार, फैयाज अहमद तसेच पंडित हुस्नलाल यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे गिरवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या आवाजाची चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली.
‘मदमस्त’ या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले. गीत, गझल, भजन, कव्वाली सारखे सर्व प्रकार ते सहजरीत्या गात असत. त्यांच्या काळातील नौशाद, सी. रामचंद्र, शंकर – जयकिशन, रवी, कल्याणजी – आनंदजी, खय्याम अशा जवळजवळ सर्व संगीतकारांसाठी ते गायले आणि अभिनेत्यांना आवाज दिला. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांमुळे त्यांना कमी संधी मिळाली. तरीदेखील एवढ्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली.
बी. आर. चोपड़ा आणि मनोज कुमार यांच्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. बी. आर. चोप्रा, संगीतकार रवी आणि महेंद्र कपूर या त्रिवेणीने अनेक यादगार गीते गायली. चोप्रा यांच्या ‘धूल का फूल’, ‘वक्त’, ‘हमराज’, ‘धुँध’ या अनेक चित्रपटांमध्ये महेंद्र कपूर यांनी गायन केले. मनोज कुमार यांचे ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘क्रांती’ यांसारखे अनेक चित्रपट यशस्वी होण्यामध्ये महेंद्र कपूर यांचेही योगदान आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपर गीते हिट झाली. ‘मेरे देश की धरती’ या गीताची लोकप्रियता अजूनही कायम आहे.
हिंदीबरोबरच त्यांनी इतर भाषांमध्येही गीते गायली. मराठी चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांचे खूप जमले. महेंद्र कपूर यांना आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा ‘फिल्म फेयर’ पुरस्कार सारखे अनेक पुरस्कार मिळाले. महेंद्र कपूर यांचे निधन 27 सप्टेंबर 2008 रोजी झाले. महेंद्र कपूर यांना आदरांजली.
शब्दांकन : संजीव वेलणकर