टीम AM : ऐन थंडीचा कडाका वाढण्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात मात्र अवकाळीची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरणात बदल झाले असून, ऋतूचक्राला शह देत भलतीच स्थिती आता राज्यात पाहायला मिळणार आहे.
याच अंदाजानुसार मंगळवारी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह जळगाव भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्येही पावसाचे ढग पाहायला मिळाले.
दरम्यान, येत्या 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नाशिक, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, जालना या जिल्ह्यांनाही पुढच्या 24 तासांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली असून, राज्यावर अवकाळीचं संकट उभं राहिल्याचं आता अधिक स्पष्ट झालं आहे.