ट्रक्टर – कारचा भीषण अपघात : मायलेकराचा जागीच मृत्यू, तिघे जण गंभीर जखमी

टीम AM : बीड – तेलगाव रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रॅक्टर – कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मायलेकराचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बीड – तेलगाव रस्त्यावर पोखरी शिवारात दिनांक 18 डिसेंबरला सोमवारी रात्री या अपघाताची घटना घडली आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील उपळी येथील नितीन सुभाष वेताळ यांनी सोमवारी [दि.18]रात्री विषारी द्रव्ये प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना स्विफ्ट कारमध्ये [MH 02 BG 9391] उपचारासाठी बीडला घेऊन जात होते. दरम्यान, कार मैंदा व घाटसावळीच्या मध्ये पोखरी शिवारात आली असता ऊस घेऊन येत असलेल्या ट्रॅक्टरची आणि कारची जोराची धडक झाली. या घडलेल्या भीषण अपघातात रत्नमाला केशव पवार [वय 41 वर्ष], प्रदीप केशव पवार [वय 24 वर्ष] दोघे रहाणार उपळी ता. वडवणी या  मायलेकराचा जागीच मृत्यू झाला. नितीन सुभाष वेताळ, अनुसया सुभाष वेताळ, प्रमोद देविदास चव्हाण हे तिघे गंभीर जखमी झाले. 

हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरचे हेड तुटून दोन तुकडे झाले तर कार चक्काचूर होऊन रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन पडली. जखमींवर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे उपळी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.