टीम AM : आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्वही गाजवणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत संजय नार्वेकर यांचे नाव अग्रक्रमांकावर येते. एकीकडे मराठी मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालत असताना, दुसरीकडे आपल्या दमदार अभिनय कौशल्याने संजय नार्वेकर यांनी हिंदी भाषिक प्रेक्षकांचंही भरपूर मनोरंजन केलं. आज (18 डिसेंबर) अभिनेते संजय नार्वेकर आपला वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…
संजय नार्वेकर यांचा जन्म मालवणमधील एका गावात झाला. लहानपणापासूनच द्वाड असणाऱ्या संजय नार्वेकर यांना अभ्यासात फार रस नसायचा. शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी कॉलेजचा टप्पा गाठला होता. त्यावेळी त्यांचा एक मित्र कॉलेजमधील ड्रामा ग्रुपमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान, या नाटकाच्या ग्रुपची तालीम सुरू होती. त्याचवेळी त्यांच्यातील एका मुलाने हा नाटक ग्रुप सोडला. काही दिवसांत एक स्पर्धा होणार असल्याने या ग्रुपला एका अभिनेत्याची गरज होती. अशा परिस्थितीत मित्राने संजय नार्वेकर यांना अभिनय करण्याची विनंती केली. अभिनयात रस नसतानाही संजय मित्राला नकार देऊ शकले नाहीत. त्यांनी ती भूमिका स्वीकारली. मात्र, या पहिल्याच नाटकानंतर त्यांच्यात अभिनयाची गोडी निर्माण झाली.
यानंतर पुन्हा एकदा संजय नार्वेकर यांचा एक मित्र त्यांना नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत पाटील यांच्याकडे घेऊन गेला. त्यावेळी कोणताही सराव न करता तू संवाद म्हणू शकशील का? असा प्रश्न त्यांना करण्यात आला. यावर संजय नार्वेकर यांनी लगेच ‘हो’ असे उत्तर दिले. त्यांचा आत्मविश्वास पाहूनच त्यांना त्या नाटकात काम मिळाले. दरम्यानच्या काळात संजय नार्वेकर यांनी ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक केले. त्यांचे हे नाटक इतके गाजले की, पुन्हा त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पण, अभिनयाऐवजी संजय नार्वेकर यांना खेळामध्ये अधिक रस होता. ‘मी अभिनेता नसतो तर, क्रिकेटर किंवा फुटबॉलपटू नक्कीच झालो असतो’, असे ते नेहमी म्हणतात.
कशी मिळाली ‘देढ फुटिया’ ची भूमिका
‘वास्तव’ चित्रपटातील ‘देढ फुटिया’ या भूमिकेने संजय नार्वेकर यांचे नशीबच पालटले होते. ही भूमिका मिळण्यामागे देखील एक किस्सा आहे. सुरुवातीला ‘वास्तव’ चित्रपटातील या भूमिकेसाठी दुसऱ्याच एका कलाकाराला फायनल करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी त्या कलाकाराने ही भूमिका करण्यास नकार दिला. संजय नार्वेकर मित्रांसोबत फिरत असताना त्यांना एक मेसेज मिळाला. ज्यात महेश मांजरेकर यांनी त्यांना ऑफिसमध्ये भेटायला बोलवले होते. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर महेश मांजरेकर यांनी केवळ त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले की, ‘तू माझ्या चित्रपटात ‘देढ फुटिया’ नावाची भूमिका करतोयस.’ एका क्षणात त्यांना ही भूमिका मिळाली होती.
संजय नार्वेकर यांनी ‘खबरदार’, ‘चेकमेट’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘जबरदस्त’, ‘अगबाई अरेच्चा’ अशा मराठी चित्रपटांमध्ये तर, ‘हंगामा’, ‘हथीयार’, ‘प्यासा’, ‘बस इतनासा ख्वाब है’, ‘फिझा’, ‘वास्तव’ अशा हिंदी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या आहेत.