टीम AM : सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांसाठी 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून या कालावधीत बीड जिल्हयातील 1033 ग्रामपंचायतींचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित सर्व संघटनानी एकत्रित घेतला आहे. राज्यातील एकूण 27 हजार 869 ग्रामपंचायतींचे कामकाज बंद राहणार आहे.
राज्यातील सर्वच ग्रामपंचायती आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवणे. ग्रामपंचायत कराची वसुली परिणामकारक होण्यासाठी या विषयावर ग्रामविकास विभागाने तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा. आमदार निधी प्रमाणे स्वतःच्या वार्डाच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना निधी राज्यस्तरावरून देण्यात यावा. ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता, सरपंच, उपसरपंच यांचे थकीत मानधन तात्काळ अदा करावे व त्यात भरीव वाढ करण्यात यावी. विमा संरक्षण द्यावे, शासकीय कमिटीत स्थान असावे, टोल माफी मिळावी इत्यादी मागण्यासाठी हा तीन दिवसाचा ‘काम बंद’ संप पुकारण्यात आला आहे.
या आंदोलनात जिल्हयातील सर्व सरपंच , ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालक यांनी सहभागी होऊन संप शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 चे मराठवाडा विभागीय सचिव सखाराम काशिद, बीड जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके व जिल्हा सरचिटणीस अविनाश राठोड यांनी केले आहे.