महाराष्ट्रात दोन दिवस कडाक्याची थंडी : तापमानात मोठी घट  

टीम AM : देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळतय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रात कडाक्याची थंंडी राहणार असून  राज्यातील तापमानात घट होऊन तापमान 10 अंशांखाली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी गोंदिया आणि पुणे शहरातील किमान तापमान 23 अंशांखाली आले. गुरुवारपासून राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली.

राज्याच्या अनेक जिल्ह्यातील तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यात गोंदिया आणि पुणे येथे सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली  आहे. गोंदिया आणि पुण्यात अनुक्रमे 12.2 आणि 12.3 अंश तापमानाची नोंद आहे. तर बीड जिल्ह्यात 14.2 अशी नोंद आहे. 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील दोन दिवस केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय, जम्मू – काश्मीर, लडाख आणि गिलगिट – बाल्टिस्तानमध्ये हिमवृष्टीसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.