टीम AM : हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा आज वाढदिवस आहे. रती आज 64 वर्षांच्या झाल्या. पण, त्यांचे सौंदर्य आजही तसेच आहे. रती यांचा जन्म मुंबईतील एका पंजाबी कुटुंबात झाला. वयाच्या 10 व्या वर्षापासून त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. रती 16 वर्षांची झाल्यावर त्यांचे वडील कुटुंबासह चेन्नईला शिफ्ट झाले. इथल्या शाळेत शिकत असतानाही त्या अभिनय करायच्या. त्याचवेळी प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक भारती राजा आपल्या नवीन चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते. एकदा भारती राजा यांनी रतीला शाळेच्या नाटकात अभिनय करताना पाहिले. त्यांनी ताबडतोब रती यांच्या वडिलांची भेट घेतली आणि महिन्याभरात चित्रपट बनवण्याचे वचन दिले. यावर रतीच्या वडिलांनीही त्यांना चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली. त्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी 1979 मध्ये रती यांनी ‘पुडिया वरपुकल’ या पहिल्या चित्रपटात काम केले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
तमिळ भाषा आवडती !
नायक भाग्यराजाने रती यांना तमिळ भाषा शिकवली. ते रती यांच्यासाठी हिंदीत संवाद लिहीत असत. लवकरच रती तामिळ भाषा देखील शिकल्या. एका मुलाखतीत रती यांनी सांगितले होते की, त्या चुकून एका पंजाबी कुटुंबात जन्माला आल्या होत्या. पण त्या मनाने तमिळच आहे. हा चित्रपट केल्यानंतर रती रातोरात स्टार झाल्या. यानंतर त्यांना चित्रपटांची ओढ लागली. तीन वर्षांत त्यांनी सुमारे 32 कन्नड आणि तेलुगू चित्रपट केले. रजनीकांत, कमल हासन, शोभन बाबू, चिरंजीवी आणि नागेश्वर राव यांसारख्या बड्या तमिळ स्टार्ससोबत त्यांनी काम केले.
अनिल विरवानीशी लग्नगाठ
रती यांनी 1981 मध्ये कमल हासनसोबत ‘एक दुजे के लिए’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. यानंतर रतीने तब्बल 43 हिंदी चित्रपटांमध्ये काम करून आपले हक्काचे स्थान निर्माण केले. रती यांच्या लग्नापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. काही काळानंतर 9 फेब्रुवारी 1985 रोजी त्यांनी आर्किटेक्ट अनिल विरवानी यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा केला. 1987 मध्ये रती आणि अनिल यांना तनुज नावाचा मुलगा झाला. यानंतर त्या आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये पूर्णपणे व्यस्त झाल्या.
30 वर्ष केला पतीने अत्याचार
रती दिसायला इतक्या सुंदर होत्या की, लग्नानंतरही त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. पण, त्यांनी कुटुंबासाठी चित्रपट केले नाहीत. लग्नाच्या 30 वर्षापर्यंत रती लाईम लाईटपासून दूर राहिल्या. पण एक दिवस अचानक त्या पोलीस ठाण्यात दिसल्या. त्यांना पोलीस ठाण्यात पाहून सर्वांनाच धक्का बसला. तेथे त्यांनी पती अनिल विरवानी यांच्यावर अत्याचार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. त्यांनी पतीविरुद्ध तक्रारही दाखल केली. दोन दिवसांनी त्या मीडियासमोर आल्या आणि पतीची सर्व गुपिते उघड केली.
एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना रती यांनी सांगितले की, गेल्या 30 वर्षांपासून त्यांना त्यांच्या पतीकडून त्रास सहन करावा लागत होता. जेव्हा पत्रकाराने त्यांना विचारले की, त्या इतके दिवस गप्प का राहिल्या ? तेव्हा रती म्हणाल्या की, मला एक ना एक दिवस हे पाऊल उचलावेच लागणार होते. माझा मुलगा तनुजसाठी मी इतके दिवस गप्प बसले. तनुजला या भांडणांपासून दूर ठेवायचे आहे, असे त्यांनी सांगितले. तनुजला याबाबत काहीच माहिती नव्हती. जेव्हा मला योग्य वाटले तेव्हाच मी जगासमोर आले.
मुलाला कळल्यावर तो म्हणाला..
तक्रार दाखल केल्यानंतर रती काही काळासाठी आईसोबत लोणावळ्याला गेल्या. अनिल त्यांना जीवे मारेल अशी भीती रती यांना होती. पण दोन दिवसांनी त्या परत आल्या आणि मुलाखत द्यायचे ठरवले. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांचा पती अनिल त्यांना मारहाण करायचा, तेव्हा तनुज जवळपास नसायचा. ही बाब तनुजला कळल्यावर त्याने आई रतीला सांगितले की, आई तू तुझे आयुष्य जग. जे तुला आनंद देते ते कर. माझ्यासाठी तुला आणखी त्रास सहन करण्याची गरज नाही. 2015 मध्ये रती यांनी पतीपासून घटस्फोट घेतला आणि आता त्या आपल्या मुलासोबत राहतात.
दमदार पुनरागम
रती यांनी काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी ‘यादे’ आणि ‘देव’ या चित्रपटात काम केले. यासोबतच 20 वर्षांनंतर त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही प्रवेश केला. तेव्हापासून त्या अनेक छोटे – मोठे प्रोजेक्ट करत आहेत.