भीम अनुयायांनी व्यक्त केला संताप
टीम AM : अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लोखंडी सावरगाव या गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘चैत्यस्मारक’ विकासापासून ‘वंचित’ राहिले आहे. केज मतदारसंघाच्या मागासवर्गीय आमदारांनी या स्मारकाकडे दुर्लक्ष केल्याने भीम अनुयायांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळेच विधानसभेची पायरी चढलेल्या लोकप्रतिनिधींनी या स्मारकाकडे दुर्लक्ष करणे ही लाजीरवाणी बाब आहे. ‘चैत्यस्मारक’ विकासासाठी लोकप्रतिनिधींनी आता तरी पावले उचलावीत, अशी मागणी भीम अनुयायांच्या वतीने करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात लोखंडी सावरगावला आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. लोखंडी सावरगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार रुजण्याची सुरुवात कुठे झाली याची पडताळणी केली असता ती महामानव डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापासून झाल्याचे पुरावे आढळून येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाची बातमी जशजशी खेडोपाडी पोहोचू लागली, तसतसे गावखेड्यातून लोक महामानवाच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला पोहोचत होते. जिथे बाबासाहेबांचा अंत्यविधी झाला तिथे नतमस्तक होत होते. बाबासाहेबांच्या निधनवार्तेने शोकाकूल झालेले लोखंडी सावरगाव व पानगाव येथील आंबेडकरी अनुयायीही मुंबईला गेले होते. त्यात लोखंडी सावरगावातील मेसाजी बनसोडे, चुडाजी बनसोडे, सटवाजी बनसोडे ही जेष्ठ मंडळी आणि तरुणांमधील पंढरीनाथ बनसोडे मुंबईला गेले होते. तेथून महामानव बाबासाहेबांच्या अस्थी आणून लोखंडी सावरगावात घडीव दगडी चिऱ्याची समाधी त्यांनी बांधली. एकप्रकारे येणाऱ्या पुढील पिढ्यांना महामानव बाबासाहेबांच्या विचार व कार्याचे सतत स्मरण होत राहील याची व्यवस्थाच त्यांनी करुन ठेवली. येथूनच आंबेडकरी चळवळीच्या प्रचार, प्रसाराला गती मिळाली. त्यानंतर लोखंडी सावरगाव येथील आंबेडकरी अनुयायी, कर्मचाऱ्यांनी 2012 साली एक लाखापेक्षा जास्त निधी उभारून महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यस्मारकाच्या नुतनीकरणाचे काम पुर्ण केले. परंतू, या सर्व गोष्टी घडत असताना मागासवर्गीय लोकप्रतिनिधींनी मात्र या स्मारकाकडे दुर्लक्ष केले.
लोखंडी सावरगाव येथील भीम अनुयायांनी लोकसहभागातून ‘चैत्यस्मारक’ या ठिकाणी विकासात्मक कामे केली आहेत. परंतू, त्या ठिकाणी अजूनही बरीचशी कामे होणे गरजेचे आहे. दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील पानगाव या ठिकाणीही बाबासाहेबांच्या अस्थी आहेत. त्या ठिकाणी करोडो रुपयांची विकास कामे आतापर्यंत झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी ज्यांना मुंबईला जाणे शक्य होत नाही, ते पानगावला जाऊन बाबासाहेबांच्या अस्थीचे दर्शन घेऊन अभिवादन करुन येतात. मात्र, लोखंडी सावरगाव येथील ‘चैत्यस्मारक’ विकासापासून ‘वंचित’ राहिले आहे. डॉ. आंबेडकरांनी राखीव मतदारसंघात दिलेल्या आरक्षणामुळे निवडून येऊन देखील केज मतदारसंघाच्या आमदारांना याचा विसर पडला आहे. मागासवर्गीय आमदार लक्ष देतील काय ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.