‘कुली’ चित्रपट आजच झाला होता रिलीज : ‘त्या’ घटनेमुळे ‘बिग बी’ यांना आजही होतोय त्रास, ‘केबीसी’ मध्ये केला खुलासा

टीम AM : ख्यातनाम गीतकार आनंद बक्षी यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत व शब्बीरकुमार यांचा सुरेल आवाज ज्या गाण्याला लाभला तो ‘कुली’ चित्रपट 2 डिसेंबर 1983 रोजी प्रदर्शित झाला. हा अमिताभ यांचा 68 वा चित्रपट होता. ‘कुली’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान 26 जुलै 1982 रोजी अमिताभ यांना अपघात झाला व ते कोमामध्ये गेले होते. तेंव्हा सर्वधर्मीय लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली व अमिताभ बच्चन यांचा पुनर्जन्म झाला. म्हणून दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी या चित्रपटाचा शेवट बदलून अमिताभ यांना चित्रपटाच्या शेवटी सर्व लोकांचे आभार मानायला लावले होते. 

बॉलिवडूमधील मेगास्टार अमिताभ बच्चन आज देखील त्या भयंकर अपघाताला विसरलेले नाहीत, जो अनेक वर्षांपूर्वी ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर घडला होता. त्या घटनेचा परिणाम अमिताभ यांच्यावर आजही होत आहे. ‘कौन बनेगा करोडपती 13’ च्या नुकत्याच झालेल्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दुर्घटनेनंतर त्यांना आजपर्यंत कोणत्या समस्येचा सामना करावा लागत आहे, आणि त्यामुळे त्यांच्यात शारिरीक कोणते बदल झाले आहेत.

अमिताभ बच्चन म्हणाले की, जेव्हा सेटवर त्यांना गंभीर दुखापत झाली, तेव्हा तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा चित्रपटाचे चित्रिकरण बंगळुरूमध्ये सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी अमिताभ यांना मुंबईला आणण्यात आले. अमिताभ यांनी सांगितले की, त्या अपघातानंतर त्यांच्यावर अनेक सर्जरी करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना बरे व्हायला अनेक महिने लागले. अमिताभ बच्चन सध्या ठिक आहेत, मात्र तो अपघात झाल्यापासून ते त्यांच्या डाव्या हाथाच्या मनगटावर पल्सची तपासणी करू शकत नाही.

‘कुली’ च्या सेटवर पुनितसोबत करत होते सीन

‘कुली’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन व पुनित इस्सर एक ऐक्शन सीक्वेंसचे चित्रिकरण करत होते. त्याचवेळी पुनित इस्सरचा एक जोरदार फटका अमिताभ बच्चनच्या पोटात लागला आणि त्यानंतर सेटचे चित्रच पूर्णपणे बदलून गेले होते. चाहता वर्ग अमिताभ यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत होते. कोणी अमिताभ यांच्या नावाने पूजा – अर्चा करत होते तर कोणी होम हवन करवून घेत होते. तेव्हा अखेर चाहत्यांच्या प्रार्थनेला यश आले आणि अमिताभ बच्चन बरे होऊन पुन्हा घरी परतले.