टीम AM : अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम आज दिनांक 18 नोव्हेंबर शनिवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने ही मोहीम हाती घेतली. जिल्हा परिषद शाळेची सरंक्षण भिंत तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयाची संरक्षण भिंत जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे काढण्यात येतील, अशा आशयाची सूचना केली होती. त्यामुळे बहुतांश अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली आहेत.
अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते – ‘स्वाराती’ रुग्णालय – यशवंतराव चव्हाण चौक या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. यासाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी अतिक्रमणांचा अडथळा सार्वजनिक बांधकाम विभागाला होत होता. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे काढली जाणार आहेत, अशी चर्चा होती. त्याला दिवाळीपूर्वी मुहूर्त सापडला आणि शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. परंतू, दिवाळीच्या दरम्यान पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक लागला. परंतू, आजपासून शहरात ही मोहीम वेगाने सुरू झाली असून शासकीय कार्यालयाच्या संरक्षण भिंतींवरही सार्वजनिक बांधकाम विभागाने हातोडा फिरविला आहे. दुसरीकडे अतिक्रमण काढल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू केले असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानकापर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे.