कृषिमंत्र्यांची संवेदनशीलता : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा भार झाला हलका

टीम AM : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्यांचे किट वाटप केले जात आहे.

धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून ‘शेतकरी कुटुंबास मदतीचा हात – संवेदन 2023’ असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे.

या किटमध्ये परसबागेतील भाजीपाला बियाणे, नॅनो युरिया, सूक्ष्म मूलद्रव्य तसेच विविध किटकनाशकांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिवाळी फराळसाठी उपयुक्त साहित्य आणि महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे उत्पादित करण्यात येत असणाऱ्या विविध वस्तूंचा समावेश आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यातील 2000 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना हे किट वाटप करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यात किटचे वितरण होणार आहे. ही किट पूर्णपणे लोकवर्गणीतून देण्यात आली आहे.

परळी येथे नुकतेच एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात कीट देण्यात आले.