टीम AM : ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री जूही चावला आता मोठ्या पडद्यापासून दूर आहे. जूहीने तिच्या सौंदर्याच्या आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. जूही त्याकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायची. आज 13 नोव्हेंबर रोजी जूहीचा वाढदिवस आहे. पंजाब येथे जन्मलेली जूही शिक्षणासाठी मुंबईला आली आणि मॉडेलिंग करायचं ठरवत जूहीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु, आपल्या लग्नाचं गुपित जूहीने तब्बल सहा वर्ष सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं.
जूही 1984 सालची मिस इंडिया स्पर्धा जिंकून सगळ्यांच्या कौतुकाला पात्र ठरली. त्यानंतर जूहीने ‘सल्तनत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून जूहीला खरी ओळख मिळाली. त्यानंतर जूहीचं जग बदललं. त्यानंतर जूहीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. ‘डर’, ‘प्रतिबंध’, ‘दरार’, ‘येस बॉस’, ‘दिवाना मस्ताना’, ‘इश्क’ या हिट चित्रपटांनंतर जूहीने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. जूहीच्या वैयक्तिक आयुष्यात इतकी उलथापालथ झाली की जूही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हती. 1998 मध्ये जूहीच्या आईचं एका अपघातात निधन झालं. त्यानंतर जूहीच्या वडिलांचं देखील निधन झालं. यावेळेस जय मेहता यांनी जूहीला सावरण्यासाठी मदत केली.
2012 साली जूहीच्या छोट्या बहिणीचा कर्करोगाने मृत्यू झाला. तर 2010 साली जूहीच्या छोट्या भावाला स्ट्रोक आला आणि 2014 साली त्याचं निधन झालं. आपल्या कुटुंबियांना गमावल्यानंतर जूही पूर्णपणे एकटी पडली होती. जूहीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशा परिस्थितीत जय तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. जेव्हा जूही आणि जय यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले तेव्हा एका कार्यक्रमात जूहीने ही गोष्ट लपवून ठेवल्याचं मान्य केलं.
जय एक बिसनेसमन आहेत. मात्र त्यांच्या डोक्यावर असलेल्या कमी केसांमुळे चाहते जूहीला पैशांसाठी लग्न केल्याबद्दल टोमणे मारू लागले. परंतु, जूहीवर या सगळ्याचा काहीही परिणाम झाला नाही.