टीम AM : शुक्रवारी रात्री नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला, ज्याचे धक्के भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले. या विनाशकारी भूकंपात नेपाळमध्ये आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. रात्री 70 जणांनी आपले प्राण गमावले होते. आणखी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
तसेच दीडशेहून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. रुकुम पश्चिम इथं 36 तर जाजरकोटमध्ये 34 जणांचा मृत्यू झाला आहे. रुकुम पश्चिमचे डीएसपी नामराज भट्टराई आणि जाजरकोट डीएसपी संतोष रोक्का यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलीये.
शुक्रवारी रात्री 11.32 च्या सुमारास झालेल्या भूकंपामुळं अनेक लोकांना घराबाहेर पडावं लागलं. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील अयोध्येपासून सुमारे 227 किमी उत्तरेस आणि काठमांडूपासून 331 किमी पश्चिम उत्तर – पश्चिम 10 किमी खोलीवर होता. नेपाळला महिनाभरात तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे.
दरम्यान, दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणारे अनेक लोक बाहेर आले. उत्तर प्रदेशातील लखनौ, बस्ती, बाराबंकी, फिरोजाबाद, अमेठी, गोंडा, प्रतापगड, भदोही, बहराइच, गोरखपूर आणि देवरिया जिल्ह्यांशिवाय बिहारमधील कटिहार, मोतिहारी आणि पटना इथंही भूकंपाचे धक्के जाणवले.