टीम AM : केवळ मराठीच नव्हे, तर बॉलिवूड चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाची जादू पसरवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज 3 नोव्हेंबर आपला वाढदिवस साजरा करत आहे. सोनाली कुलकर्णीने मराठी आणि हिंदीसह साऊथ चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य दाखवले आहे. अभिनय आणि चित्रपटांमुळे चर्चेत असणारी सोनाली कुलकर्णी हिच्याभोवती वादांचे वलय देखील मोठे आहे. कधी ती तिच्या दुसऱ्या लग्नामुळे, कधी श्रीदेवीशी झालेल्या पंग्यामुळे, तर कधी मुलींबद्दलच्या वादग्रस्त विधानांमुळे सोनाली चर्चेत राहिली आहे.
आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणाऱ्या सोनाली कुलकर्णीने दोनदा लग्न केले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे पहिले लग्न चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी झाले होते. घटस्फोटानंतर ‘दिल चाहता है’ फेम अभिनेत्रीने सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचे प्रमुख नचिकेत पंतवैद्य यांच्याशी लग्न केले. अभिनेत्रीने स्वतः दोनदा लग्न केले आहे, पण तिने विवाहित महिलांवर वादग्रस्त विधाने करत खळबळ उडवली होती.
सोनाली कुलकर्णी विवाहित महिलांबद्दल बोलताना म्हणाली होती की, ‘भारतातील स्त्रिया आळशी झाल्या आहेत, ज्यांना फक्त नवरा किंवा प्रियकर हवा आहे… जो चांगला कमावतो, त्याचे घरही चांगले असते.’ या नंतर सोनाली कुलकर्णी चांगलीच ट्रोल झाली होती. यानंतर तिने सोशल मीडियावर जाहीर माफी देखील मागितली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने श्रीदेवीसोबतही पंगा घेतला होता.
श्रीदेवीने ‘इंग्लिश – विंग्लिश’ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन केले होते. त्याचदरम्यान सोनाली कुलकर्णीचा ‘द गुड रोड’ हा गुजराती चित्रपटही प्रदर्शित झाला होता. सोनालीच्या चित्रपटाची ऑस्करमध्ये भारतीय चित्रपट म्हणून निवड झाली होती. त्यादरम्यान श्रीदेवी म्हणाली होती की, मी ‘द गुड रोड’ हे नाव देखील ऐकलेलं नाही. श्रीदेवीच्या वक्तव्यावर सोनाली कुलकर्णी भडकली होती. यानंतर सोनाली कुलकर्णीने श्रीदेवीला चांगलंच ऐकवलं होतं. सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.