शासकीय कापूस खरेदी 27 नोव्हेंबरला सुरु होणार

राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत सोळंके, संचालक राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई : महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून उताराही घटल्याने खाजगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतकर्‍यांची होणारी ही आर्थिक पिळवणूक व नुकसान बघता महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने 27 नोव्हेंबरपासून शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

यावर्षी कपाशीची पेरणी राज्यात 42 लाख हेक्टरवर झाली आहे. परंतु सतत व परतीच्या पावसाने कापूस पिकाची प्रचंड नुकसान झाले आहे. मान्सुन पुर्व कापसाची काही ठिकाणी वेचणी करण्यात आली. बाजारात अत्यंत कमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. पश्‍चिम विदर्भात सप्टेंबर महिन्यातच खाजगी कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. सुरुवातीला या केंद्रांवर प्रति क्विंटल 5 हजार 600 रुपये दर देण्यात आले, परंतु कापूस भिजल्याने व्यापार्‍यांनी दर कमी केले असून आज मितीस हे दर प्रति क्विंटल 3800 ते 4800 रुपयांपर्यंत घटले आहेत. केंद्र सरकारने या वर्षी धाग्याच्या लांबीनुसार कापसाची आधारभूत किंमत ठरविली असून आखुड धाग्याच्या कापसाचे दर प्रति क्विंटल 5255 तर लांब धाग्यांच्या कापसाचे दर 5550 इतके जाहिर केले आहे. परंतु सरकारने खरेदी केंद्र सुरु केले नसल्याने शेतकर्‍यांना खाजगी बाजारात आपला कापूस विकावा लागत आहे. त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

या पार्श्‍वभुमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी गुरुवार, दिनांक 13 नोव्हेंबर रोजी प्रधान सचिव (पणन) अनुप कुमार यांची भेट घेतली व कापूस केंद्र लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार पणन महासंघाने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात बुधवार,दि.27 नोव्हेंबर पासून टप्याटप्याने 45 खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी या केंद्रांवर आपला कापूस विक्री करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी यांनी केले आहे.