टीम AM : अंबाजोगाई शहरात रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली गडगंज लोकांचे घरे भरण्याचे काम चालू आहे. विकासकामांना आमचा विरोध नाही, पण रस्ता किती फुटाचा होणार ? अतिक्रमणाबाबत लेखी सूचना नाही ? अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन होणार की नाही ? याची कुठलीही माहिती न देता सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत, अशी माहिती पत्रकार परिषदेत ॲड. इस्माईल गवळी यांनी दिली.
अंबाजोगाई शहरात मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ‘स्वाराती’ रुग्णालय रस्त्यावर अनेक जणांचे खाजगी मालकीचे घरे असून तेही पाडण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. परंतू, सार्वजनिक बांधकाम विभाग कुठल्याही पध्दतीची माहिती न देता अतिक्रमणे काढत आहेत. खाजगी मालकीच्या लोकांना मोबदला मिळणार का ? त्यांचे पुनर्वसन होणार का ? सगळे प्रश्न अनुत्तरित असताना अतिक्रमणे काढण्याची घाई कशाला ? असा सवाल नागरिकांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला प्रा. रमीज सर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
उद्याचा मोर्चा रद्द
दरम्यान, अंबाजोगाई तालुका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी उद्या नागरिकांनी मोर्चाचे आयोजन केले होते. परंतू, प्रशासनाने नागरिकांशी चर्चा करण्यास सहमती दर्शविल्याने उद्याचा होणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती ॲड. इस्माईल गवळी यांनी दिली आहे.