अंबाजोगाईत अतिक्रमणावर हातोडा : कोणाचीही गय केली जाणार नाही, चार दिवस चालणार मोहीम

टीम AM : अंबाजोगाई शहरातील अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने हातोडा फिरवला असून मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे आजपासून काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दोन दिवसापासून शहरातील अतिक्रमणे काढण्यात येतील, अशा आशयाची सूचना केली होती. त्यामुळे बहुतांश अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली. 

अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते – ‘स्वाराती’ रुग्णालय – यशवंतराव चव्हाण चौक या मुख्य रस्त्याचे नूतनीकरण होणार आहे. यासाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी अतिक्रमणांचा अडथळा सार्वजनिक बांधकाम विभागाला होत होता. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे काढली जाणार आहेत, अशी चर्चा होती. ‘या’ तारखेला अतिक्रमणे काढणार ? पुढच्या तारखेला काढणार ? रस्त्याचे काम कधी सुरु होणार ? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून अखेर आजपासून शहरातील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. 

अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावरील संपूर्ण अतिक्रमणे काढण्यात येणार असून यात कोणाचीही गय केली जाणार नाही, अतिक्रमणे काढण्याची मोहीम सलग चार दिवस चालणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अतिक्रमणे काढताच मुख्य रस्त्यावरील पोल शिफ्टींगचे काम हाती घेण्यात येणार असून लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जेसीबी, मोठे क्रेन यासह विविध यंत्रसामग्री घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील यशवंतराव चव्हाण चौकापासून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. यावेळी बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी हजर होते.