मराठा आरक्षण : 40 दिवसांची मुदत संपली, जरांगे पाटलांचं उपोषण सुरु

टीम AM : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं आजपासून पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. उपोषण सुरु करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याआधी दिलेली 40 दिवसांची मुदत संपली असून, सरकारनं आपल्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नसल्याचं ते म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे देखील अद्याप मागे घेतले नसल्याचं त्यांनी सांगितलं. कायद्याच्या चौकटीत बसेल असं 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मराठा समाजाला देण्याची जरांगे यांनी मागणी केली. यावेळी औषध किंवा सलाईन सुद्धा घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा बांधवांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी, आलेल्या नेत्यांना शांततेने परत पाठवावं, असंही त्यांनी समाज बांधवांना सांगितलं. 

ग्रामविकास मंत्र्यांनी केली चर्चा

दरम्यान, या पत्रकार परिषदेदरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत उपोषण न करण्याची विनंती केली होती. सरकार आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, जरांगे यांनी उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.