टीम AM : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी दुपारी श्री. योगेश्वरी देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी मंदिरातून निघाली. ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषात व फटाक्यांच्या आतीषबाजीने, आराधी मेळाव्याच्या भजनाने वातावरण दुमदुमून निघाले होते. श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सांगता मंगळवारी झाली.
यावेळी मंदिरात तहसीलदार विलास तरंगे, देवल कमेटीचे सचिव ॲड. शरद लोमटे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त, मानकरी, पुरोहित यांच्या उपस्थितीत विधिवत झालेल्या महापुजेनंतर दुपारी एक वाजता पालखी मंदिरातून सिमोल्लंघनासाठी निघाली. पालखी मंदिराच्या बाहेर येताच भाविकांनी ‘आई राजा उदो उदो’ च्या गजरात पालखीवर पुष्वृष्टी केली.
फटाक्यांची आतीषबाजी, ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक वाद्ये व आराध्यांच्या मेळ्यासह पालखी मार्गक्रमण करीत मंडीबाजार, खोलेश्वर मंदिर, रविवारपेठ, खडकपुरा, परळीवेस, अण्णाभाऊ साठे चौक, आंबेडकर चौक, सायगाव नाका, जुना पेट्रोलपंप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुवार पेठ मार्गे पालखी मंदिरात पोहोचणार आहे. शहरात ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या, स्वागत कमानी व होणारी पुष्वृष्टी आणि दर्शनासाठी जागोजागी महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती.