टीम AM : नागराज मंजुळे निर्मित 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’ चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले. यातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता नाळ – 2 प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.
‘भिंगोरी’ असं या गाण्याचं नाव असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांचं संगीत त्याला लाभलं आहे. या गाण्याला वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर या सुरेल गाण्याला मास्टर अवन, कडुबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा आवाज लाभला आहे. मराठी लोकगायिका कडुबाई खरात यांच्या आवाजातील हे पहिलंच चित्रपट गाणं आहे.
कोण आहेत कडुबाई खरात ?
औरंगाबादच्या कडुबाई खरात या डॉ. आंबेडकर यांच्यावर गाणी गाण्यासाठी ओळखल्या जातात. ‘मह्या भीमानं सोन्यानं भरलिया ओटी..’ हे त्यांचं गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. त्यांना पहिल्यांदाच चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आहे. ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी ही संधी दिली आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी ‘नाळ’ चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.