किसान सभेच्या आंदोलनाचा दणका ; पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा मंजुर झालेला २०१८ चा खरीप व रब्बीचा पीकविमा अद्याप पर्यंत मिळालेला नाही.कोट्यावधी रूपये शेतकऱ्यांना विमा कंपनी कडुन मिळाले नसल्याने बीड जिल्हा किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी पुणे येथील दि.ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी च्या कार्यालयासमोर जोपर्यंत आमच्या खात्यात पीकविमा जमा होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. या निर्धाराने बुधवार पासुन बेमुदत सत्याग्रह करत आहेत. शनिवार दि. १६ रोजी या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.

या आंदोलनामुळे ज्यांना यापूर्वी पीक विमा ओरिएंटल कम्पनीने नाकारला होता. त्यातील 30% शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली आहे. तसे एसएमएस शेतकऱ्यांना मिळतील असे निवेदन क्षेत्रीय प्रबंधक पी. एस. मूर्ती यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळासमोर केले. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात जरी झाली आहे. लढ्याला यश येत असले तरी हा लढा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत सुरुच राहणार असल्याचे ॲड. अजय बुरांडे यांनी सांगितले.

इतर राजकीय पक्ष सत्ता स्थापनेच्या स्वार्थी राजकारणात मशगुल असताना शेतकर्यांच्या प्रश्नावर किसान सभा मात्र अत्यंत अभ्यासू आंदोलन करत असल्याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. ॲड. अजय बुरांडे, कॉ.अजीत अभ्यंकर, कॉ.सुदाम शिंदे, कॉ.भागवत देशमुख,डॉ. ज्ञानेश्वर मोटे, कॉ.विशाल देशमुख, सखाराम शिंदे, ॲड. अशोक डाके हे करीत आहेत. परळी तालुक्यातील तीनशे शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वाखाली पुणे येथे चार दिवसा पासुन आंदोलन करित आहेत.