टीम AM : ‘स्वाराती’ रुग्णालयात औषधांचा मुबलक साठा असून यंत्रसामुग्रीही सुस्थितीत आहे. त्यामुळे रुग्णांनी रुग्णालयात येऊन निसंकोचपणे उपचार करून घ्यावेत, असे आवाहन ‘स्वाराती’ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी केले आहे.
नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्याशी संवाद साधला.
या संदर्भात डॉ. भास्कर खैरे यांनी माहिती देताना सांगितले की, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘स्वाराती’ रुग्णालयात सर्व डॉक्टर, विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेत सर्वांना आरोग्य सुविधा देण्यासाठी सूचना केल्या. सध्या रुग्णालयात 30 ते 40 लाखांचा औषधांचा साठा असून आम्ही स्थानिक पातळीवरही औषधं खरेदी करण्याची तयारी ठेवली आहे. जेणेकरून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यासह इतर यंत्रसामुग्री सुस्थितीतपणे कार्यरत असून याचा फायदा रूगांना होत आहे.
नांदेड, छत्रपती संभाजीनगर सारखी घटना ‘स्वाराती’ रुग्णालयात घडू नये, यासाठी पूर्ण खबरदारी घेतली आहे. रुग्णांनी निसंकोचपणे रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी केले आहे.
वर्ग 3 आणि 4 ची रिक्त पदे..
‘स्वाराती’ रुग्णालयात डॉक्टरांची संख्या पुरेशी असली तरी वर्ग 3 आणि 4 च्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. वर्ग 3 मध्ये परिचारिका तर वर्ग 4 मध्ये आरोग्य सेवक या पदांची कमतरता असल्यामुळे थोडासा ताण आरोग्य सेवेवर पडत आहे. परंतू, आहे त्या कर्मचाऱ्यांच्या बळावर आम्ही योग्य नियोजनाद्वारे रुग्णांना चांगली रुग्णसेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. वर्ग 3 आणि 4 ची रिक्त पदे भरण्यात यावीत, यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठविला असून त्याचा पाठपुरावा देखील करण्यात येत असल्याची माहिती ‘स्वाराती’ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.