अंबाजोगाई : वरपगावं येथील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील कु. मयुरी कसबे ही विद्यार्थीनी शासकीय आय.टी.आय कॉलेज, अंबाजोगाई या ठिकाणी शिक्षण घेत आहे. वरपगाव ते लोखंडी सावरगाव 3 कि.मी. पायी चालत येऊन अंबाजोगाई येथे कॉलेजला येऊन परत गावी ये-जा करत होती. यामुळे तिला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसे. तसेच शारीरिक श्रम खुप होत असल्याने जुनी सायकल मिळावी यासाठी “आधार माणुसकीचा” उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांना विनंती केली.
कोणाकडील तरी जुनी सायकल उपलब्ध व्हावी या हेतूने ॲड.पवार यांनी फेसबुकवर शेअर केले असता, अंबाजोगाई येथील अज्ञात देणगीदार यांनी धनराज पवार यांना फोन करून सांगितले की, नावाचा उल्लेख न करता कु. मयुरी हिला मनपसंत सायकल घेऊन देतो. तसेच अंबाजोगाई येथील सामान्य कुटुंबातील ज्ञानेश्वर शिंदे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या विद्यार्थ्यास पुस्तके घेण्यासाठी आर्थिक अडचण होती. ही बाब अशोक बाबूराव हाराळे यांना सांगितली असता त्यांनी पुस्तके घेण्यासाठी सहकार्य केले.
पत्रकार जगन सरवदे, रघुनाथ जगताप, बालाप्रसाद बजाज, रोहिदास हातागळे, भांडवलकर यांच्या हस्ते कु.मयुरी हिस नवीन सायकल व चि.ज्ञानेश्वर यास पुस्तके घेण्यासाठी धनादेश ज्ञानेश्वरच्या आईकडे देण्यात आला. या प्रसंगी मयुरीच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून होता.