अंबाजोगाई : संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी मानवी कल्याणाचा मार्ग दाखविला,असे प्रतिपादन राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी येथे केले. पासष्ट वर्षांची परंपरा असलेल्या चापोली ते कपिलधार पदयात्रेचे शनिवारी येथील यशवंतराव चौकात मन्मथ स्वामी मार्गावर भव्य स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. शिवलिंग शिवाचार्य बोलत होते. यावेळी शंभूलिंग शिवाचार्य, सिद्धदयाळ शिवाचार्य (बेटमोगरा), शंकरलिंग शिवाचार्य (शिरूर अनंतपाळ), सोमशंकर महाराज (निलंगा), संतोष महाराज (सुकणी), बालानंद महाराज (चापोली),मल्लीकार्जून महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.शिवलिंग शिवाचार्य म्हणाले, मानवी कल्याणासाठी संतांचा अवतार आहे. महात्मा बसवेश्वर , संत ज्ञानेश्वर, मन्मथ स्वामी यांनी माणसाला माणूसकीने वागविण्याचा मानवतेचा खरा धर्म सांगितला. अहंकार दूर ठेवा, निंदा करू नका, दूरवर्तन टाळा, चोरी करू नका, सत्य बोला असे अवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, राजकिशोर मोदी, अनंत लोमटे, गिरीधारी भराडिया, सुनिल लोमटे, प्रशांत आदनाक, विजयकुमार चलवदे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, प्रभुअप्पा दामा, बाळू राऊत, बाळू खंदारे, विनोद पोखरकर,अशोक पाटील, प्राचार्य डॉ. खडकभावी, प्राचार्य शेट्टी, नगरसेविका संगीता सुनिल व्यवहारे,नगरसेवक ताहेर भाई , राजू रेवडकर,संजय बुरांडे यांनी मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत केले.
सुरुवातीला शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश काळे यांनी केले. यावेळी दिंडी व्यवस्थापन समितीचे भगवंत पाटील, मन्मथअप्पा पालापूरे , बाबूराव सोनटक्के, उध्दव हैबतपूरे, संजय उस्तुरगे, नीळकंठ बिराजदार, शंकर येरूळे, गणेश पारशेटे यांचेही स्वागत करण्यात आले. महाआरती, प्रवचन आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.