प्रा. डी. जी. धाकडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
टीम AM : केवळ नौकरी व कुटूंब यातच न गुरफटता ग्रंथालय चळवळ जोपासून, परिवर्तनवादी चळवळीला गतीमान करण्याचे मौलिक कार्य प्रा. डी. जी. धाकडे यांनी केले, असे प्रतिपादन नागपुर येथील दिक्षाभूमीचे सचिव, तथा रिपाईचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी केले.
येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डी. जी. धाकडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अमृत महोत्सव सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेंद्र गवई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा होते. तर मंचावर ‘स्वाराती’ चे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, माजी आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, केजच्या नगराध्यक्षा सिता बनसोड, प्रा. एस. के. जोगदंड, अॅड. अनंतराव जगतकर, वसंतराव मोरे, दत्तात्रय पाटील, सत्कारमुर्ती प्रा. डी. जी. धाकडे, प्रा. शकुंतला धाकडे, स्वागताध्यक्ष अॅड. सुनिल सौंदरमल यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राजेंद्र गवई म्हणाले की, प्रा. डी. जी. धाकडे यांनी अंबाजोगाईत आल्यानंतर आंबेडकरी चळवळीला नवी दिशा दिली. उपेक्षित माणसाला समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. धार्मिक, सामाजिक, सहकार, शैक्षणिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. प्रा. डी. जी. धाकडे यांच्या कार्याचा वारसा त्यांचे सुपूत्र डॉ. राहुल धाकडे पुढे खंबीरपणे जोपासत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना डी. जी. धाकडे म्हणाले की, सध्याचे राजकारण आणि समाजकारण कोणत्या दिशेला जात आहे, असा प्रश्न उपस्थित करून योगेश्वरी शिक्षण संस्थेचा मोठा वाटा आपल्या जडण – घडणीत असल्याचे त्यांनी सांगितले. या गावाने मला खुप प्रेम दिले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी बाबासाहेब परांजपे यांनी मला इथे बोलावून माझ्या आयुष्याला कलाटणी दिल्याचे सांगितले. जीवनात अनेक देव माणसं भेटली, म्हणूनच मी काम करू शकलो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, प्रा. डॉ. कमलाकर कांबळे, राजकिशोर मोदी, सिता बनसोड, संजय दौंड, पृथ्वीराज साठे, प्रा. के. जी. कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अमृत महोत्सव समितीच्या वतीने प्रा. डी. जी. धाकडे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. सुनिल सौंदरमल यांनी केले. संचालन परमेश्वर गित्ते यांनी केले तर उपस्थितांचे आभार भिमाशंकर शिंदे यांनी मानले.