लागेल तेवढा वेळ घ्या पण आरक्षण द्याच, जरांगे पाटलांचं उपोषण मागे

टीम AM : मागच्या 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवेली सराटा गावात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं. आज त्यांच्या उपोषणाच्या 17 व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई करत जरांगे पाटील यांना उपोषण मागे घ्यायला लावले. उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे यांनी लागेल तेवढा वेळ घ्या परंतू आरक्षण द्याच, असे म्हणत आपली भूमिका जाहीर केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या 17 व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिष्टमंडळाने भेट घेतली. जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. त्यांच्या या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून फळांचे ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं. आतापर्यंत जरांगे पाटील आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या. सरकारचं शिष्टमंडळ उपोषण सोडण्यासाठी तसंच जरांगे पाटल्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत प्रयत्नशील होतं, अखेर या सर्व चर्चांना यश आल्याचं दिसून येत आहे.