टीम AM : सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा आज 13 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. तिने 1997 साली प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्यासोबत या चित्रपटात शाहरुख खान, अमरीश पुरी, अपूर्व अग्निहोत्री हे कलाकार दिसले होते.
महिमाचा हा पहिलावहिला चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. ती लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणून ओळखू लागू लागली होती. मात्र, करिअर यशाच्या शिखरावर असताना महिमाचा भयानक अपघात झाला होता. त्यानंतर तिचे संपूर्ण आयुष्य बदलले होते.
महिमा ‘दिल क्या करे’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. एक दिवस ती स्वत: गाडी चालवत सेटवर पोहोचत होती. त्यावेळी समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने तिच्या गाडीला धडक दिली. या अपघातामध्ये महिमा गंभीर जखमी झाली. जवळपास 67 काचांचे तुकडे तिच्या चेहऱ्यावर रुतून बसले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
एका मुलाखतीमध्ये महिमा या अपघाताविषयी बोलताना म्हणाली की, ‘मला वाटले की मी आता मृत्युमुखी पडेन, कोणीही मला रुग्णालयात नेणारे नाही. दवाखान्यात पोहोचल्यानंतर बऱ्याच वेळाने माझी आई आणि अजय देवगण तिथे पोहोचले. ऑपरेशननंतर जेव्हा मी माझा चेहरा आरशात पाहिला तेव्हा मी खूप घाबरले.
‘दिल क्या करे’ चे निर्माते अजय आणि काजोल यांनी माझ्या अपघाताबद्दल कोणालाच कळू दिले नाही, कारण त्यावेळी माझे संपूर्ण करीअर उद्ध्वस्त झाले असते. माझ्यावर उत्तम उपचार व्हावेत, यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.’