अंबाजोगाईत डेंग्यूचा धोका वाढला : 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

आरोग्य, नगरपरिषद प्रशासन झोपेत

टीम AM : अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाघाळा गावात काही दिवसांपूर्वी बहिण – भावंडाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. आता अंबाजोगाई शहरातही डेंग्यू आजाराने पाय पसरले असून एका 12 वर्षीय मुलाचा या आजाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

नबी मिया समद मिया कुरेशी असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान, शहरातील अनेक भागात वाढत्या डासांमुळे डेंग्यूचे रुग्ण वाढत असून याकडे मात्र आरोग्य आणि नगरपरिषद प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. नगरपरिषद प्रशासनाने वेळीच पावले उचलून शहरातील वस्त्यांमध्ये फवारणी आणि उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे. शहरातील दमगानपुरा भागात राहणाऱ्या नबी मिया समद मिया कुरेशी या मुलाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याने इतर वस्त्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अंबाजोगाईकरांनीही वाढत्या डेंग्यू आजाराचा सामना करण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.