टीम AM : चंद्रपूरमध्ये ट्रकने – स्कुटीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रपूर – नागपूर महामार्गावर आज सकाळी हा अपघात झाला. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रकला धडकताच शिक्षिका रस्त्यावर पडली आणि ट्रकचे चाक तिच्या अंगावरून गेले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चंद्रपूर – नागपूर महामार्गावर भरधाव वेगात ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अनिता किशोर ठाकरे या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. अनिता ठाकरे या श्रीकृपा कॉलनीत, जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर इथे राहत होत्या. त्या जिल्हा परिषदेच्या लखमापूर शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शाळेत जात असताना हा अपघात घडला.