‘कहो ना प्यार है’ : करीनाला सिनेमातून काढून टाकले होते, अमिषा पटेलचा मोठा खुलासा

टीम AM : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सध्या ‘गदर 2’ चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद घेत आहे. सकीना बनून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘गदर 2’ चित्रपट कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करताना दिसत आहे. अमिषा तिचा हा आनंद मीडियाशी संवाद साधून व्यक्त करत आहे. नुकताच तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री करीना कपूर – खान विषयी वक्तव्य केले आहे. तिचे हे वक्तव्य सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अमिषा एका मुलाखतीमध्ये म्हणाली की, ‘खरंतर करीनाने हा चित्रपट सोडला नाही. राकेशजी यांनी मला सांगितले होते की, करीनाला त्यांनी चित्रपट सोडण्यास सांगितला. कारण त्या दोघांमध्ये मतभेद झाले होते. हे ऐकून राकेश रोशन यांच्या पत्नीला धक्काच बसला होता. कारण सेट तयार होता आणि सोनिया या भूमिकेसाठी आम्हाला तीन दिवसात अभिनेत्री शोधायची होती. कोट्यावधी रुपये खर्च झाले होते.’

पु़ढे ती म्हणाली, ‘अभिनेता हृतिक रोशनने या चित्रपटातून पदार्पण केले होते आणि सर्वजण तणावत होते. राकेश यांनी मला एका लग्नात पाहिले होते आणि ते संपूर्ण रात्र झोपले नाहीत. ते सतत सोनिया सापडली, सोनिया सापडली असे म्हणत होते. फक्त आता तिने होकार दिला पाहिजे.’ असं राकेश रोशन यांच्या पत्नीने सांगितल्याचं अमिषा म्हणाली.

2020 मध्ये राकेश रोशन यांनी करीनाला का रिप्लेस करण्यात आले यामागचे कारण सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, करीनाची आई बबिता खूप जास्त सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत होती. त्यामुळे बरे झाले तिने हा चित्रपट सोडला. करीनाने अमिषाला चित्रपटात घेण्याबाबत देखील मत मांडले होते. अमिषा या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्री नाही, असे राकेश रोशन यांना म्हणाली होती.