टीम AM : भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांचा कालखंड लोटला तरीही देशातील जातीवाद संपायचं काही नाव घेत नाही. राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यात मागासवर्गीयांवर जातीवादातून झालेल्या अन्यायाची घटना समोर आली आहे. या प्रकरणात जातीवादाला कंटाळलेल्या युवकाने थेट अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यातील युवकाने अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. किशोर सीताराम झिंझुर्डे ( वय, 30 रा. कवटळी, ता. परळी जि. बीड) असे सदरील युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे अंबाजोगाईत एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, किशोर झिंझुर्डे हा न्यायालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करीत असतानाच परिसरातील वकील, बॉंड विक्रेते यांनी त्यास तात्काळ थांबवले. काडीपेटी हिसकावून घेत त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक चांद मेंडके, पोलीस नाईक पोटभरे यांनी सदरील युवकास ताब्यात घेतले.
परळी तालुक्यातील कवटळी येथे विहिरीवर पाणी आणण्याच्या कारणातून दि. 31 जुलै 2021 रोजी किशोर आणि सुधाकर झिंजुर्डे यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर सुधाकर झिंजुर्डे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. पण अजूनही सदरील युवकास मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे युवकाने आज टोकाचे पाऊल उचलले. या घटनेचा जातीअंत संघर्ष समितीचे निमंत्रक बब्रुवान पोटभरे यांनी निषेध नोंदवला आहे.