टीम AM : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही बैठक झाली.
शरद पवार काल पुण्यात होते. तसेच चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारही पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार – अजित पवार यांच्यात भेट झाल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे.
शरद पवार – अजित पवार यांच्या भेटीची बातमी माध्यमांना कळाल्यानंतर उद्योगपतीच्या बंगल्याबाहेर पत्रकार जमा झाले. अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सुरुवातीला शरद पवार हे घराबाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने अजित पवारांचा ताफा बंगल्यातून बाहेर पडला. मागील काही दिवसांपासून शरद पवार – अजित पवार दोन्ही गट एकत्र येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात पवार काका – पुतणे यांच्यात ही भेट झाली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपासोबत मी जाणार नाही, अशी ठाम भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. मात्र, अजित पवार – शरद पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एकीकडे शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे. त्यात येवला येथील सभेनंतर आता शरद पवार बीडमध्ये सभा घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून शरद पवारांची ही स्वाभिमान सभा असल्याचे म्हटलं आहे.