केज मतदारसंघात पुन्हा भाजपचा झेंडा ; नमिता मुंदडा यांचा विजय

माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचा 33,096 मतांनी पराभव

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदार संघाच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली असुन मतदार संघात भाजपाचा पुन्हा झेंडा फडकला आहे. भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा या विजयी झाल्या आहेत तर राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना पराभव पत्करावा लागला आहे. नमिता मुंदडा यांना 1,22,736 मते मिळाली तर पृथ्वीराज साठे यांना 89,640 मते मिळाली. यात पृथ्वीराज साठे यांचा 33,096 मतांनी पराभव झाला आहे.

केज विधानसभा राखीव मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणूकीत अनेक चढउतार पहायला मिळाले. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली असताना पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे मुंदडा कुटुंबाने भाजपात प्रवेश करत नमिता मुंदडा यांना उमेदवारी मिळविली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असताना मुंदडा कुटुंब भाजपात गेल्याने ऐनवेळी राष्ट्रवादीने साठेंना उमेदवारी जाहीर केली. तर वंचित बहुजन आघाडीकडून वैभव स्वामी उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु साठेंना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळणार अशी दाट शक्यता असल्याने स्वामींचीही निवडणूक लढण्याची आशा धुसर झाली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून साठेंना उमेदवारी दिल्यानंतर ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून वैभव स्वामींना उमेदवारी देवून निवडणुकीच्या मैदानात उतरविले.

मुंदडा, साठे, स्वामींची उमेदवारी फिक्स झाल्यानंतर मतदार संघात प्रचाराचा धुराळा उडाला. त्यात साठेंना विजयी करण्यासाठी राजकिशोर मोदींही मैदानात उतरत निवडणुकीत रंगत आणली. मुंदडा, साठे, स्वामीं हे तीन उमेदवार चर्चेत असले तरी खरी लढत मुंदडा आणि साठे यांच्यातच झाली. केज मतदार संघाच्या निवडणुकीत अनेक आरोप – प्रत्यारोप झाले. मतदार संघात भाजपकडून पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खा. प्रीतमताई मुंडे, आमदार सुरेश धस व अक्षय मुंदडा यांनी प्रचाराचे रान पेटवत विरोधकांवर निशाना साधला. तर राष्ट्रवादी व मित्रपक्षांकडून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनीही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अंबाजोगाई शहरातील सभेतही मोदी, शहा यांच्यासह राज्यातील नेतृत्वावर सडकून टीका केली. त्यामळे निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले होते. निवडणूकीत मतदानानंतर सर्वांचे लक्ष आजच्या मतमोजणीकडे लागले होते. आज झालेल्या मतमोजणीत केज मतदारसंघातील जनतेने भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या बाजूने कौल दिला असुन त्यांना केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून स्वीकारले आहे. तर राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे उमेदवार पृथ्वीराज साठे दुसऱ्या क्रमांकावर तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वैभव स्वामी तिसर्‍या क्रमांकावर राहिले आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या या निवडणुकीत मुंदडा आणि साठें यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

केज मतदारसंघात पुन्हा मुंदडा पर्व

केज विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. पराभवाने निराश न होता मुंदडा कुटुंबाने मतदार संघातील जनतेशी संपर्क तुटू दिला नाही. त्याचेच फलित म्हणून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघातील जनतेने नमिता मुंदडा यांच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे मतदार संघात पुन्हा मुंदडा पर्व सुरू झाले आहे.

आनंदोत्सव साजरा न करण्याचे मुंदडांचे आवाहन

केज मतदार संघातून भाजपच्या उमेदवार नमिता मुंदडा या विजयी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय नंदकिशोर मुंदडा यांनी घेतला आहे. कोणीही पुष्पहार, गुलाल, पेढे आणू नयेत किंवा फटाके फोडू नयेत. आपण कोणाचाही सत्कार स्वीकारणार नाही, केवळ भेटून अभिनंदन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, हा विजय स्व. गोपीनाथरावजी मुंडे, स्व. विमलताई मुंदडा आणि पंकजाताई मुंडे यांना समर्पित करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.